Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगरमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा; नागरिक दुर्गंधीने हैराण!

मुक्ताईनगरमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा; नागरिक दुर्गंधीने हैराण!


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कचरा संकलन आणि साफसफाईच्या कारभारात मागील २ वर्षांपासून मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपंचायतीकडून कचरा संकलनासाठी कंत्राटदाराला महिन्याला आठ लाख रुपये, म्हणजेच वर्षाला तब्बल १ कोटी रुपये दिले जात असतानाही, शहरात स्वच्छतेचा अभाव असून नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटानुसार दररोज प्रत्येक प्रभागात कचरा गाडी येणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कचरा गाडी चार ते पाच दिवसांनी किंवा त्याहूनही अधिक उशिराने येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. घरासमोर साचलेल्या कचऱ्यामुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून अनेक नागरिक नाइलाजाने उघड्यावर कचरा फेकण्यास मजबूर झाले आहेत. यामुळे शहरात अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कचरा गाडीवरील ड्रायव्हरनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ध्या कचरा गाड्या बंद पडल्या असून त्यांची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे एका गाडीवर दोन ते तीन प्रभागांची जबाबदारी असल्याने कचरा संकलनाला विलंब होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून हीच समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कंत्राटदाराला कोट्यवधी रुपये देऊनही मुक्ताईनगर शहरात मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपंचायतीला अपयश आल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गंभीर प्रकाराबाबत वरील स्तरावरून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नागरिक नियमितपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतानाही त्यांना कचऱ्याच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकरणातून नागरिकांची कधी सुटका होणार, असा सवाल आता मुक्ताईनगरचे नागरिक नगरपंचायतीला विचारत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती पाऊले उचलावीत, अशी मागणी मुक्ताईनगरकर करत आहेत.


Protected Content

Play sound