मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. तब्बल १५ दिवस सोशल मीडियावरून पूर्णपणे गायब झाल्यामुळे ती इंडस्ट्री सोडणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र आता स्वतः प्राजक्ताने समोर येत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, ती नेमकी कुठे होती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या प्राजक्ता माळीने अचानक सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तिच्या अनुपस्थितीमुळे विविध तर्कवितर्क लावले जात होते. काहींनी तर ती अभिनय क्षेत्र सोडणार असल्याची शक्यताही व्यक्त केली होती.

मात्र सोशल मीडियावर पुनरागमन करत प्राजक्ताने स्पष्ट केले की, ती इंडस्ट्री सोडण्याचा कोणताही विचार करत नाही. उलट, ती अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहणार असून, आपल्या कामात अधिक जोमाने सहभागी होणार आहे. तिच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
प्राजक्ता माळी गेल्या १५ दिवसांपासून आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन च्या बंगळुरू येथील आश्रमात विशेष प्रशिक्षणासाठी होती. या काळात तिने पूर्णपणे डिजिटल डिटॉक्स करत फोनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बाहेरील अन्नही तिने घेतले नाही. या कालावधीत तिने शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही स्तरांवर सखोल प्रशिक्षण पूर्ण केले.
तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, ती आता ‘Happiness Programme’ ची अधिकृत शिक्षिका बनली आहे. या प्रशिक्षणादरम्यान दररोज पद्मसाधना आणि इतर विविध साधना केल्या असून, हा अनुभव शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचेही तिने सांगितले. लवकरच ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही तिने जाहीर केले आहे.
पोस्टच्या शेवटी प्राजक्ताने स्पष्ट शब्दांत लिहिले की, “मी अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही. गेल्या आठ वर्षांप्रमाणेच अभिनय आणि या नव्या जबाबदारीमध्ये समतोल राखणार आहे.” तिच्या या वक्तव्यामुळे सुरू असलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच अलीकडेच तिची ‘देवखेळ’ ही वेब सिरीजही प्रदर्शित झाली आहे. आगामी काळात तिचे अनेक चित्रपट आणि प्रकल्प प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनयासोबतच आता अध्यात्माच्या दिशेने टाकलेले हे पाऊल प्राजक्ताच्या आयुष्यातील नवे पर्व ठरणार असल्याचे मानले जात आहे. चाहत्यांकडून तिच्या या निर्णयाचे स्वागत होत असून, तिच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



