जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे २८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे दर सेकंदाला धरणातून ३० हजार ४४२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रातील सर्वत्र पाऊस झाल्याने तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदी पत्रात गुरेढोरांना सोडू नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत ध.ब. बेहेरे व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.