“वॉक फॉर यूनिटी” उपक्रमातून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन


अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे पहिले गृहमंत्री आणि “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलिस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या भव्य एकात्मता यात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी महाराणा प्रताप चौकातून या यात्रेचा शुभारंभ झाला. देशाच्या ऐक्य, सलोखा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम अमळनेर शहरात उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

सकाळी नेमक्या सात वाजता महाराणा प्रताप चौक येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने झेंडा दाखवून “वॉक फॉर युनिटी” यात्रेला सुरुवात करण्यात आली. या वेळी पोलिस अधिकारी, शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलिस पाटील, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यात्रेत सहभागी सर्वांनी हातात फलक, बॅनर आणि तिरंगा घेऊन शहरभर “एकता अमर रहे”, “भारत माता की जय”, “जय एकता – जय भारत” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमवले.

या यात्रेचा उद्देश समाजात ऐक्य, बंधुता आणि परस्पर सलोखा वृद्धिंगत करणे हा होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत या उपक्रमातून नागरिकांना राष्ट्रीय एकतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सहभागी नागरिकांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला पाठिंबा देत देशासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

“वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाने अमळनेर शहरात एकतेचा, देशभक्तीचा आणि सामुदायिक सौहार्दाचा सुंदर संदेश दिला. लोहपुरुष सरदार पटेलांच्या प्रेरणेने प्रेरित झालेली ही यात्रा नागरिकांच्या मनावर ठसा उमटवून गेली.