वर्ष उलटूनही कार्यादेशाची प्रतीक्षा : आमरण उपोषणाचा इशारा (व्हिडिओ)

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी दि. २७ मार्च २०२० रोजी शासन मान्यता प्राप्त झाली असून अद्यापही निविदाधारकास कार्यारंभ आदेश मिळत नसल्याने दि. १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबत विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

तथापि, लोहारा हे गाव पाचोरा तालुक्यात असले तरी ते जामनेर मतदारसंघात येत असून जिल्हा परिषदेतही भाजपाचीच सत्ता आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळविणारे जिल्हा परिषद सदस्य व लोहारा येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्याने केवळ राजकीय द्वेषापोटी इमारतीच्या बांधकामास तांत्रिक मान्यता मिळूनही ११ महिने लोटले गेले तरीही निविदा धारकास कार्य आरंभ आदेश मिळत नाही.

यामुळे दि. १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, उपसरपंच विमलबाई हिरालाल जाधव, व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याच्या आशयाचे निवेदन सरपंच व उपसरपंचणी, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पाचोरा – मतादार संघाचे आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुन्या व पडक्या स्वरूपाची झाली आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील लोहारा, कळमसरा, शहापुरा, कासमपुरा, म्हसास, म्हसास (तांडा), रामेश्वर (तांडा), लाख तांडा, कुऱ्हाड बु”, कुऱ्हाड खु”, कुऱ्हाड तांडा या परिसरातील असंख्य गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने इमारतीची स्थिती अतिशय बिकट झाली असून ती केव्हा कोसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवून ३ कोटी ५५ लाख रुपयांची दि. २७ मार्च २०२० ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यांनतर या अंदाज पत्रकास दि. १४ ऑगस्ट २०२० ला तांत्रिक मान्यता देऊन दि. २० नोव्हेंबर २०२० ला निविदा प्रसिद्ध करून सदरची निविदा दि. २९ जानेवारी २०२१ रोजी उघडण्यात आली होती.

निविदेच्या सर्व शर्ती, अटी पूर्ण करून मक्तेदार सुनिल पाटील यांनी सर्वात कमी किंमत भरल्याने ती मंजूर करून त्यांना मिळायला हवे होते. मात्र तसे न होता श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव यांनी सदरची निविदा परिपूर्ण नसल्याचे दाखवत फेटाळून लावली होती. याबाबत श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून न्याय मागितला होता. परंतु न्यायालयाने त्यांच्या रिट याचिकेतील मागणी केलेल्या विनंतीस कुठलेही आदेश पारित केलेले नसतांना मुद्दाम जिल्हा परिषद प्रशासनाकडून अडचण निर्माण करण्यात येत असल्याने इमारतीच्या बांधकामाचा कार्य आरंभ आदेश दि. १ डिसेंबरचा अल्टीमेंन्टम दिला असुन जळगाव येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर दि. १ डिसेंबरला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमरण उपोषणास बसणार आहे.

जिल्हा परिषद सदस्यही देणार उपोषणास पाठिंबा

लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शिवसेनेचे लोहारा – कुऱ्हाड गटातील जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत यांनी पाठपुरावा केला होता. या इमारतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. मात्र केवळ राजकीय द्वैषापोटी आरंभ आदेश मिळत नसल्याचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. व लोहारा येथील पदाधिकाऱ्यांसोबतच जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत हे स्वतः व शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील हे ही उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/501956524201562

 

Protected Content