जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी बांधवाना या हंगामात पिक कर्ज थेट बँके मार्फत न करता विविध कार्यकारी सोसायट्यां मार्फतच करावे अशी मागणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक रोहिणी खडसे यांनी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना पत्रा मार्फत केली आहे
रोहिणी खडसे पत्रामध्ये म्हणतात, शेतीसाठीचे पीक कर्ज त्रिस्तरीय पातळीवरून वाटले जाते. नाबार्ड जिल्हा बँकेला पतपुरवठा करते. जिल्हा बँक विविध कार्यकारी सोसायट्यांना पैसे देते व त्यानंतर विविध कार्यकारी सोसायट्या गट सचिवां मार्फत सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात परंतु दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस शेतीमालाला हमीभाव न मिळणे इ. बाबी मुळे जिल्हयातील शेतकरी बांधव वेळेवर पिक कर्ज भरू शकला नाही त्यामुळे वि.का.सोसायटी अनिष्ट तफावत (इनबॅलन्स फिगर) गेल्या आहेत .
आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेने जिल्हयातील ५० लाखावरील अनिष्ट तफावत असणाऱ्या जिल्हयातील २९१ विविध कार्यकारी सह सोसायट्यांच्या सभासदांना त्या विकासो मार्फत कर्जपुरवठा न करता थेट जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या शाखांमार्फत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयामुळे या विविध कार्यकारी सह सोसायटीच्या सभासदां मध्ये बँक व संस्थेच्या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे बऱ्याच वि.का.सेवा संस्थांच्या संचालकांनी, सभासद शेतकऱ्यांनी व बँकेच्या संचालकांनी नाराजी व्यक्त करत वि.का.सेवा सोसायट्यांमार्फतच पिक कर्जाचे वितरण व्हावे अशी मागणी केलेली आहे. तसेच या निर्णयामुळे काही राजकीय मंडळी विविध अफवा पसरवत आहेत त्यामुळे बँकेची व विकासो संस्थांची प्रतिमा मालिन होत आहे.
त्यामुळे शेतकरी सभासदांचा आणि संस्था हिताचा विचार करून चालू हंगामात बँकेने विविध कार्यकारी सेवा सह सोसायट्यांमार्फतच पिक कर्ज वितरित करावे व पुढील वर्षी वाटप केलेल्या पिक कर्जाची जास्तीत जास्त वसुली करून संस्था अनिष्ट तफावत मधुन कशा बाहेर काढता येतील याबाबत बँकेचे अधिकारी व गटसचिव यांनी नियोजन करावे अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे