चोपडा, प्रतिनिधी| चोपडा विधानसभा मतदार संघाच्या सोमवार २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या विधानसभा चोपडा विधानसभा मतदारसंघात ३१८ मतदान केंद्र राहणार असून ३ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे चोपडा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
चोपडा मतदारसंघातील मतदान केंद्रावर १ हजार ७५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार ईव्हीएम सीयु ३८२ व बी. यु. ३८२ आणि व्ही. व्ही. पॅट आहेत. तसेच पोलीस विभागातर्फे एकूण ४७३ पोलिसांचा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस अधिकारी, ३०४ पोलीस कर्मचारी आणि १५६ होमगार्ड यांचा समावेश आहे. मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रावर पोहोचण्याकरिता ३० एसटी बसेस, ११ मिनी बसेस, २६ जीप यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चोपडा मतदारसंघात एकूण ३८ क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच ५ सूक्ष्मनिरीक्षक ज्याठिकाणी ३ मतदान केंद्रापेक्षा जास्त केंद्र आहेत अशा १९ ठिकाणी मतदान सहाय्यक, पाळणाघराकरिता २०७ अंगणवाडी सेविका , मदतनीस यांची नेमणूक केली आहे. तसेच साहित्य वाटप आणि स्वीकृतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर डोम क्रमांक १,२,३ चोपडा येथे १६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम, व्ही.व्ही. पट राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. १ मधील भाग २ चोपडा येथील स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूम यावल येथील तहसील कार्यालयात तयार करण्यात आलेली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.