चोपडा प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र, चोपडा आयोजित तीन दिवसीय “शिक्षक प्रबोधन कार्यशाळा ” दि. ११, १२ व १३ जून रोजी खास बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणात ज्ञान-रचनावाद प्रभावी करण्यासाठी व अध्यापन करत असताना विद्यार्थी व शिक्षकांना येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे दूर कराव्यात, हा मुख्य उद्देश ठेवून कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळा पुणे येथील ग्राममंगल सोबत काम करणारे प्रसाद मणेरीकर घेत असून ते म्हणतात की, ज्ञान-रचनावाद प्रभावी होण्यामागे प्रयोगशील शाळा व त्यात शिकवणारे शिक्षकांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. ज्ञान-रचनावाद शिक्षणात अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठण्याची व विविध शैक्षणिक प्रयोग करण्याची गरज आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले तर निश्चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल, असे यावेळी सांगितले. ज्ञान-रचनावादी पद्धतीमध्ये महत्त्व हे शिकवण्याला नसून शिकण्याला आहे. आम्ही ज्ञान-रचनावादी पद्धतीने शिकवतो असे म्हणण्यापेक्षा आमच्या शाळेत मुले ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकतात. शिक्षक म्हणून आम्ही काय करतो, तर मुलांना ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकण्यासाठी मदत करतो. अशी भूमिका शिक्षकांची असावी लागेल, त्या पद्धतीने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना कसे अध्यापन करावे, याचे प्रबोधन त्यांनी शिक्षकांना केले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसाद मणेरीकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, उपशिक्षक संजय सोनवणे यांनी सरस्वतीदेवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन-दीपप्रज्वलन करून, पाहुण्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. प्रतिदिवशी सर्व शिक्षकांनी अनुक्रमे ज्ञानगीत, चिमुकल्या ज्ञान देणे, विद्यालय माझे मला मुळीच वाईट वाटत नाही. पणती जपून ठेवा या गीतांनी करण्यात आले. नंतर प्रसाद मणेरीकर यांनी घड्याळी पाच तास मार्गदर्शन करत अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, नवनवीन शिकण्याची, शिकवण्याच्या कल्पकता कशा कराव्यात, याबाबत अमूल्य असे मार्गदर्शन त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केले. कार्यशाळेचे फलक लेखन व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते, अभिषेक शुक्ल यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजय सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास बालवाडी व प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते.