Home क्रीडा विवेक कोल्हेची राष्ट्रीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड

विवेक कोल्हेची राष्ट्रीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड


पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विवेक कोल्हे याने राज्यस्तरीय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मान मिळवला आहे. उंड्री, पुणे येथे २ व ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ठ खेळ करत विवेकने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग मोकळा केला.

या स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर विवेकची ११ ते १३ डिसेंबर २०२५ रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही निवड विद्यालयासाठी, शिक्षकांसाठी तसेच जळगावकरांसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

सांघिक गटामध्येही विवेकने उल्लेखनीय खेळ करत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुलांच्या या पदक विजेत्या संघात विवेकचा समावेश असल्याने त्याच्या कामगिरीला अधिक भर पडली आहे.

विवेकच्या यशात त्याचे वर्गशिक्षक श्री. मनोज यशवंत महाजन आणि क्रीडाशिक्षक श्री. अनिल भास्कर नेमाडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे विद्यालय प्रशासनाने नमूद केले आहे. दोन्ही शिक्षकांच्या मेहनतीने आणि मार्गदर्शनाने विवेकने राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास यशस्वी केला आहे.

प्राचार्य पी. जी. भालेराव, पर्यवेक्षक संजय महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विवेकचे मनःपूर्वक अभिनंदन करत उज्ज्वल भवितव्याची शुभेच्छा दिल्या. विद्यार्थीदशेतच राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या विवेकच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून तो भावी काळातही स्क्वॅश क्रीडेत आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound