विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागाने मानले डॉ. निलेश चांडक यांचे आभार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील भाजीपाला विक्रेती महिलेला गेल्या काही वर्षापासून छातीत गाठ होती , पण अजाणतेपणामुळे आणि काही आर्थिक परिस्थितीला विवश असल्याकारणाने सदर महिलेने तिचा हा त्रास कोणालाही न सांगता सहन केला. त्यापरिनामी सदर छातीतील गाठ खूप मोठी झाली आणि दिनांक 19/09/2024 रोजी ती गाठ अचानकपणे फुटली आणि त्यातून खूप रक्तस्राव होवू लागला. सदर महिलेची काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी सुद्धा झालेली होती आणि त्याकरणाने तिला रक्त पातळ होण्याची गोळीही चालू असल्याकारणाने तिला ती गाठ फुटल्यानंतर तिला खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला. नातेवाईकांनी त्या महिलेला जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणले असता सदर रुग्णालयाने त्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या महिलेला ऍडमिट करण्यात आले व तिच्या काही प्राथमिक तपासण्या तिथे करण्यात आल्या.

सदर महिलेच्या नातेवाईकांनी जळगाव विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागाशी संपर्क केला असता तात्काळ विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र युवराज गायकवाड आणि सहसेवा प्रमुख दिपकभाऊ दाभाडे यांनी रात्री सुमारे 12:30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून सदर महिलेच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यावेळी ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरांशी त्या महिलेच्या एकूण तब्येतीचा आढावा घेतला. त्यात असे समजले की त्या महिलेला शरीरात फक्त 2.8 एवढेच रक्त शिल्लक आहे आणि प्राथमिक ती गाठ कॅन्सर या आजाराची असल्याची शंका असल्यामुळे त्याक्षणी विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा सेवा विभागाने डॉ.निलेश चांडक सरांना फोन करून सदर महिलेची सर्व माहिती दिली आणि त्या महिलेला आपल्याला काही मदत करता येईल का अशी विचारपूस केली. त्यावेळी डॉ. निलेश चांडक सरांनी सदर महिलेला त्यांच्या रुग्णालयात घेवून या असे सांगितले. त्याप्रमाणे सदर महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून डिस्चार्ज घेवून त्या महिलेला रात्री अंदाजे दीड वाजेच्या सुमारास डॉ.निलेश चांडक यांच्या कॅन्सर हॉस्पिटल तेथे ऍडमिट करण्यात आले.

डॉ.चांडक सरांच्या हॉस्पिटल मध्ये कुठलीही शासकीय योजना नसतांना देखील सरांनी तात्काळ सदर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या महिलेवर योग्य तो सर्व उपचार केला व त्या महिलेला मुख्यमंत्री सहायात निधी मंजूर होण्यासाठीचे सर्व कागदपत्रे तयार करून दिले. आज रोजी ती महिला सुखरूप आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सेवा विभागाच्या विनंतीला मान देवून डॉ.निलेश चांडक सरांनी सदर महिलेला माणुसकी आणि एक सामाजिक बांधिलकी जपून जी सर्व मदत केली आणि सदर महिलेचा जीव वाचविला त्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ.हितेंद्र युवराज गायकवाड आणि सह सेवा प्रमुख दिपकजी दाभाडे , तसेच विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री राजेन्द्जी गांगुर्डे यांनी डॉ.निलेश चांडक सरांचा यथोचित सत्कार करून सरांचे आभार मानले , आणि सरांना त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content