मुंबई प्रतिनिधी । प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा ‘विष्णुदास भावे’ गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबरला प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णूदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ‘रंगभूमी दिना’ला येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर संस्था व नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार समारंभपूर्वक दिला जातो. १९५२ पासून या पुरस्कारांची फार मोठी अशी परंपरा आहे. नाट्यक्षेत्रातील या मानाच्या पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची निवड झाल्याचे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. विष्णुदास भावे यांच्या नावाचं गौरवपदक, ११ हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये आजही त्यांची भूमिका पाहायला मिळते. त्यांना आत्तापर्यंत ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘अर्थ’ आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तसेच २०१७ मध्ये बालगंधर्व परिवारातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.