दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १३ वर्षांनंतर आज रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो आहे. त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पुनरागमनाची बातमी आधीच क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकतेचा विषय बनली होती. आजच्या सामन्याच्या दिवशी त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमबाहेर सकाळपासूनच चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिल्लीतील क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. सोशल मीडियावर या प्रचंड गर्दीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.


विराट कोहलीच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येईल की, स्टेडियमबाहेर चाहत्यांनी २ किलोमीटर लांब रांगा लावल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे चाहत्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे विराटला पुन्हा रणजी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याची ही सुवर्णसंधी मोठ्या प्रमाणात लोकांनी उचलून धरली आहे. विराट कोहलीने २०१२-१३ च्या रणजी हंगामानंतर प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. दिल्लीचा सामना रेल्वे संघाशी होत असून, हा सामना विराटच्या करिअरसाठी आणि चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.
विराटचा हा २४वा रणजी सामना असेल. याआधीच्या २३ सामन्यांमध्ये त्याने ५ शतके झळकावली असून, १५४७ धावा काढल्या आहेत. सरासरी ५० पेक्षा अधिक आहे. विराट कोहलीसाठी हे घरचे मैदान विशेष राहिले आहे. अरुण जेटली स्टेडियमवर त्याने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ८ डावात ६६.३७ च्या सरासरीने ५३१ धावा केल्या आहेत. या धावसंख्येत ५६ चौकारांचा समावेश आहे. विराटच्या पुनरागमनामुळे दिल्लीतील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मैदानाबाहेर चाहत्यांनी ‘विराट! विराट!’च्या घोषणा दिल्या. सोशल मीडियावरही विराट कोहलीचा रणजीमध्ये पुनरागमन हा चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. या सामन्यात विराट कोहलीची कामगिरी कशी राहते हे पाहणे रंजक ठरणार आहे.


