मुंबई (वृत्तसंस्था) विश्वचषक स्पर्धेत झालेला पराभव आणि त्यानंतर संघातील गटबाजीच्या समोर आलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आता विराट कोहलीचे कर्णधारपद जाणार असल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआय गांभीर्याने करत असल्याच्या चर्चेला उधान आले होते. संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळणारा भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. यानंतर आता बीसीसीआयकडून संघाचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले की, मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करु शकतो. तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते. दरम्यान, आगामी काही दिवसात बीसीसीआय याबाबत निर्णय घेऊ शकते, असेही कळते.