यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर मोबाईलद्वारे “लहान मुलं पळविणारी टोळी विविध राज्यांत सक्रिय असून शेकडो मुलांचे अपहरण करत आहे” अशा प्रकारच्या संदेशांचा पूर आला आहे. या व्हायरल पोस्टमुळे यावल शहरातील शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांमध्ये दिल्ली व गुजरातसह विविध राज्यांत मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुलं व मुली बेपत्ता झाल्याचा दावा केला जात आहे. काही पोस्टमध्ये महिला व पुरुषांची टोळी सक्रिय असून ते लहान मुलांचे अपहरण करत असल्याचे म्हटले जात आहे. या संदेशांना कोणतीही अधिकृत पुष्टी नसतानाही ते वेगाने व्हायरल होत असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

“जर या बातम्या खऱ्या असतील तर शाळा आणि विद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घ्यावी,” अशी मागणी काही पालकांकडून व्यक्त होत आहे. शाळेच्या परिसरात अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांना वेळेवर सोडणे, तसेच पालकांनीही मुलांना एकटे न पाठविणे, अशा सूचना दिल्या जात आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अपुष्ट आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अफवांमुळे अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडूनही स्पष्ट माहिती देण्याची गरज व्यक्त होत आहे.



