यावल प्रतिनिधी । यावल फैजपूर रोडवरील एका हॉटेलच्या परिसरात गावठी पिस्तुल व काडतूस बाळगणाऱ्या संशयित आरोपीला यावल पोलीसांनी अटक केली आहे. गावठी पिस्तूल व काडतूससह दीड लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित युवराज घारू (वय-२१) रा. श्रीरामनगर यावल असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली समोरील एका पानटपरी जवळ संशयित आरोपी सुमित घारू हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. यावल पोलीस ठाण्याचे पथक रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी ६.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी सुमित घारू याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळ २० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. शिवाय ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७० हजार रुपये किमतीची (एमएच १९ डीपी १८७५) क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुशिल घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा यावल पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. दरम्यान त्याच्या संशयास्पद हालचाली पोलीसांच्या लक्षात आल्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती देखील यावल पोलिसांनी दिली.