वडेट्टीवारांचे घुमजाव : म्हणे अनलॉकला ‘तत्वत:’ मान्यता : अंतीम निर्णय मुख्यमंत्री घेणार !

नागपूर प्रतिनिधी । राज्यातील पाच लेव्हलनुसार अनलॉक करण्यात येणार असून याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी करून या विषयावरून घुमजाव केले आहे. तर वडेट्टीवार यांच्या घोषणेमुळे जळगावसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून नेमके खरे काय ? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

सायंकाळी पाच वाजता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची ब्रेकींग न्यूज दिल्याने खळबळ उडाली. खरं तर इतकी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा असतांना विजय वडेट्टीवार यांनी केल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला.

वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने तातडीने राज्यातील निर्बर्ंध उडविण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. तर ही पत्रकार परिषद घेऊन विजय वडेट्टीवार हे नागपुर येथे रवाना झाले. येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण पूर्णपणे अनलॉकबाबत बोललेच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाच लेव्हलवरील अनलॉकला तत्वत: मान्यता दिलेली आहे. मात्र याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे त्यांनी सांगितले. अर्थात, त्यांनी या प्रकरणी स्पष्टपणे घुमजाव केले.

अर्थात, विजय वडेट्टीवार यांनी अति उत्साहात राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार असल्याचे घोषीत करून प्रचंड खळबळ उडवून दिली हे मात्र निश्‍चित. तर यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव देखील समोर आला आहे.

Protected Content