समाजसेवेतून आनंदपूर्ती मानणारे नि:स्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे विजय लुल्हे – शेखर पाटील यांचे भावोद्गार
समाजसेवेतून आनंदपूर्ती मानणारे नि:स्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे विजय लुल्हे – शेखर पाटील यांचे भावोद्गार
3 years ago
जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “अध्यापन, कलास्वाद व समाजसेवेतून आनंदपूर्ती मानणारे नि:स्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे उपक्रमशील प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे होय.” असे भावोद्गार लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजचे संपादक शेखर पाटील यांनी काढले.
तरसोद जि.प.प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचा सेवापूर्ती सदिच्छा सोहळा कार्यक्रम कलाग्राम, नशिराबाद येथे दि.४ जून २०२२ रोजी अनौपचारिक वातावरणात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना संपादक शेखर पाटील बोलत होते.
मैत्रीमंचावर चोपडा ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, स्व.पी. कुमावत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कलाशिक्षक शाम कुमावत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध चित्रकार पिसुर्वो, निवृत्त कलाशिक्षक व प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, स्थापत्य अभियंता संजय भावसार, सत्कारार्थी विजय लुल्हे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय पिताश्री ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार व स्वर्गीय भगिनी निर्मिती लुल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण विजय लुल्हे यांनी केले. त्यानंतर दीपप्रज्वलन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.
“स्व.गुरुवर्य सुपडू सुतार यांनी माझ्या कलेला दिलेले प्रोत्साहन कलाशिक्षक होण्यासाठी जीवनाला कलाटणी देणारे ठरले. स्नेही कलावंत विजय लुल्हे व राजेंद्र महाजन यांनी विद्यार्थीदशेत कलाभिरुची जोपासून कलाकौशल्याची जाणीव दिल्याने माझ्यातील कलावंताचा पाया घडला.” असे मत निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले. “विजय लुल्हे हे गुणग्राही मॅग्नेट व मैत्रीचा मांजा आहे.” असे विचार भुसावळचे सेवानिवृत्त कलाशिक्षक व आर्टिस्ट व्हिजन गृपचे संस्थापक राजेंद्र जावळे यांनी मांडले.
“गुरुबंधू विजय लुल्हे यांच्या विद्यार्थीदशेतील सहवासातील आठवणी व गुरुवर्य सुतार गुरुजी यांनी सर्वांगीण विकासासाठी केलेले शैक्षणिक, कलात्मक व क्रीडात्मक स्पर्धेतील मार्गदर्शन मला मौलिक ठरले. “ अशी भावना मुख्याध्यापक हेमंत धांडे यांनी व्यक्त केले. विजय लुल्हे यांचा प्रेरक सहवास कमी मिळाल्याची खंत व्यक्त करून त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगडताना सहकारी शिक्षक अविनाश मोरे यांनी अनेक आठवणीना उजाळा दिला.
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी, रावेर समन्वयक कलाशिक्षक भाषणात प्रेमादराने म्हणाले की, “पुस्तक भिशी संघटनात शिस्तप्रिय व वक्तशीर असलेले ग्रंथप्रेमी विजय लुल्हे वैयक्तिक जीवनात मात्र स्वतः बाबत बेजबाबदार असून तब्बेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात.”
व्यवहारशून्य उपेक्षित शिक्षक –
“विजय लुल्हे हा विद्यार्थीभिमुख सहशालेय उपक्रम राबविणारा वेडा व व्यवहारशून्य शिक्षक आहे. उपेक्षा हेच विजयचे आत्मिक बळ असल्याने तो वैयक्तिक समस्यांवर मात करू शकला.” असे मार्मिक मत त्यांचे स्नेही तथा चोपडा ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी व्यक्त केले तसेच लुल्हे यांच्या जीवनातील सुखदुःखाचे ऑडिट करून उपस्थितांना अंतर्मुख केले.
सेवापूर्ती सत्काराला उत्तर देतांना विजय लुल्हे यांनी, “माता-पित्यांचे तत्वनिष्ठ संस्कार दीपस्तंभासमान असल्याने मी जीवनातील पराभव पचवून विद्यार्थीभिमुख कृतार्थ शिक्षक होऊ शकलो. कोविड काळात मित्र व सहकार्यांनी दिलेले आर्थिक व भावनिक पाठबळ तसेच सुकन्यांनी निर्भयपणे केलेल्या सेवेमुळे दोनदा कोविड ग्रस्त होऊनही मला नवे जीवदान मिळाले. यापुढेही मित्रपरिवाराचे स्नेहपूर्ण पाठबळ निरंतर मिळाल्यास मी खंबीरपणे उभा राहून यशाशक्ती सामाजिक कार्यात कार्यरत राहीन.” असा आशावाद विजय लुल्हे यांनी व्यक्त केला.
सत्कार करणाऱ्या विविध संस्था व मान्यवर –
स्व.पी.जी.कुमावत प्रतिष्ठान, नशिराबाद
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी, रावेर
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव
सर्वज्ञ स्मार्ट क्लासेस , जळगाव
कृष्णा क्लासेस, असोदा
सहकारी जि.प .शाळा तरसोद
कार्यक्रमाची क्षणचित्रे –
– सुकन्या सुवर्णा व समीक्षा यांनी सन्मानार्थी पिताश्री विजय लुल्हे यांचे केले औक्षण
– गुरुमाऊली श्रीमती सिंधूताई सुतार व गुरुबंधू विजय लुल्हे यांना कपडे भेट देऊन कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी भावपूर्ण सत्कार केला.
– अध्यक्षांशिवाय मैत्रीपूर्ण कौटुंबिक वातावरणात उत्साहात सदिच्छा सोहळा संपन्न झाला.
– सुप्रसिद्ध मुक्त चित्रकार पिसुर्वो यांनी विजय लुल्हे यांचे सुंदर रेखाटन काढून सप्रेम भेट दिली.
– डॉ. कुणाल पवार यांच्या कवितांवर पोस्टर पोएट्री करणारे आर्टिस्ट श्याम कुमावत व सुनिल दाभाडे यांचा भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगाव तर्फे शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
– “तेरे जैसा यार कहा” या दोस्ताना चित्रपटातील समयोचित गीत कलाशिक्षक विजय वानखेडे यांनी तालासुरात गाऊन आणली कार्यक्रमात रंगत आणली.
– बालमित्र नरेंद्र महाजन व स्नेही भागवत वाघ यांची प्रमुख उपस्थिती
– सन्मित्र स्व.कवी विरहानंद सारंगी व स्व.जगन्नाथ साठे यांचे पुण्यस्मरण
वक्त्यांच्या भाषणातून उमटला विजय लुल्हे या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कौतुकाचा सूर –
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास व गतीमंदांसाठी ज्यादा वर्ग घेणे, कला व कार्यानुभव, शारीरिक शिक्षणानुषंगे उपक्रम, कार्यशाळा, संस्कार परीक्षा, संविधानावर आधारीत परीक्षांचे स्वखर्चाने आयोजनातून व्यक्तिमत्व विकास, दिवंगत विद्यार्थ्यांच्या नावाने पुरस्कार वितरण, विद्याथ्यांच्या संस्कार संपन्नतेसाठी शाळेत अ.भा.साने गुरुजी कथामालेची स्थापना, महात्मा ज्योतिबा फुले समूह स्थापन करून जिल्ह्यातील शिक्षक साहित्यिकांना संघटित करून व्यासपीठ देणारे उत्तम संघटक, गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण, ज्ञानरचनावादी शिक्षण देणारे सृजनशील शिक्षक, नैसर्गिक आपत्तीत मदतनिधी उभा करून मुख्यमंत्री निधीला देणे, कोविड काळात स्थलांतरीतांना अन्नदान, रक्तदान शिबिरांचे आयोजन, अपंगांना आर्थिक सहकार्य मिळवून देणे आदी समाजाभिमुख कार्य विजय लुल्हे यांनी केले.
विविध शाळाबाह्य स्पर्धा, कार्यशाळा, कला प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन, थोरांचे सुविचार स्वखर्चाने खेडोपाडी स्वतः लिहून विचार जागृती करणारे तळमळीचे समाजसेवक, ना नफा ना तोटा तत्वावर संस्कारक्षम पुस्तके, दिवाळी अंक, आरोग्य मासिकांची चालता बोलता विक्री, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम शालेय वाचनकट्टा अंतर्गत लोकसहभागातून यावल तालुक्यातील जि.प. शाळांना १००० चरित्रात्मक पुस्तकांचे वितरण, मोफत वृत्तपत्र वाचनालय, ग्रंथालय उभारणे, शिक्षकांसाठी जिल्ह्यात पुस्तक भिशीचा अभिनव उपक्रम राबवून वाचक चळवळ राबविणारे ग्रंथप्रेमी, प्रात्यक्षिकांसह व्याख्यान, मुलगी वयात येतांना व मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमान्वये आरोग्य प्रबोधन, मरणोत्तर नेत्रदान व देहदान प्रचार, वैज्ञानिक सार्वजनिक होळी, निर्माल्य संकलन उपक्रमांन्वये अंधश्रद्धा निर्मूलन करत त्यांनी विज्ञाननिष्ठ कार्य केले.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना व समाज सेवक, शिक्षक-शिक्षिकांना पुरस्कार देऊन समाजाचे ऋण फेडणारे निःस्वार्थी गुणग्राहक, सफाई,प्लॉस्टिक मुक्ती, सार्वजनिक वृक्षारोपण करणारे पर्यावरणप्रेमी,ज्येष्ठ नागरिक दिन, डॉक्टर्स डे, मातृदिन, कन्यादिन दिनविशेषांचे औचित्य साधून सत्कार व सन्मान करून नैतिक मूल्ये आप्तेष्ट व समाजात जोपासना करणारे भाववेडे असा कौतुकाचा सूर वक्त्यांमधून उमटला.
या कार्यक्रमास अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, मातोश्री श्रीमती सिंधु सुतार, शाम कुमावत यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला कुमावत, संगिता कुमावत, सुकन्या सुवर्णा लुल्हे, समीक्षा लुल्हे, देवेश्री बुंदेले, आर्किटेक्ट प्रमोद माळी, प्रा.वदना माळी, मनोज शिरसाठ, श्याम सोनवणे, युवासेना जळगाव जिल्हाध्यक्ष जितेंद्र बारी, अंनिस कार्यकर्ते शिरीष चौधरी, सर्वज्ञ स्मार्ट क्लासेसच्या संचालिका सुरेखा बडगुजर, कृष्णा क्लासेस, असोदा संचालिका सौ.बाविस्कर, सहकारी शिक्षक मनोहर बाविस्कर, महेश बच्छाव, विक्रम महाजन आदी उपस्थित होते.
जनमत प्रतिष्ठान व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रय्क्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपस्थितांना जनमत प्रतिष्ठानतर्फे सुग्रास भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी कलाग्रामचे संस्थापक कलाशिक्षक श्याम कुमावत, प्रताप कुमावत, स्वप्नील पाटील, हेमंत सावकारे, डि.एन.पाटील, शंतनु कुमावत, सोहम कुमावत, मोहित माळी आणि सहकार्यांनी सहकार्य केले.