जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “अध्यापन, कलास्वाद व समाजसेवेतून आनंदपूर्ती मानणारे नि:स्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे उपक्रमशील प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे होय.” असे भावोद्गार लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजचे संपादक शेखर पाटील यांनी काढले.
तरसोद जि.प.प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचा सेवापूर्ती सदिच्छा सोहळा कार्यक्रम कलाग्राम, नशिराबाद येथे दि.४ जून २०२२ रोजी अनौपचारिक वातावरणात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना संपादक शेखर पाटील बोलत होते.
मैत्रीमंचावर चोपडा ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, स्व.पी. कुमावत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कलाशिक्षक शाम कुमावत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध चित्रकार पिसुर्वो, निवृत्त कलाशिक्षक व प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, स्थापत्य अभियंता संजय भावसार, सत्कारार्थी विजय लुल्हे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय पिताश्री ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार व स्वर्गीय भगिनी निर्मिती लुल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण विजय लुल्हे यांनी केले. त्यानंतर दीपप्रज्वलन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले.
“स्व.गुरुवर्य सुपडू सुतार यांनी माझ्या कलेला दिलेले प्रोत्साहन कलाशिक्षक होण्यासाठी जीवनाला कलाटणी देणारे ठरले. स्नेही कलावंत विजय लुल्हे व राजेंद्र महाजन यांनी विद्यार्थीदशेत कलाभिरुची जोपासून कलाकौशल्याची जाणीव दिल्याने माझ्यातील कलावंताचा पाया घडला.” असे मत निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले. “विजय लुल्हे हे गुणग्राही मॅग्नेट व मैत्रीचा मांजा आहे.” असे विचार भुसावळचे सेवानिवृत्त कलाशिक्षक व आर्टिस्ट व्हिजन गृपचे संस्थापक राजेंद्र जावळे यांनी मांडले.
“गुरुबंधू विजय लुल्हे यांच्या विद्यार्थीदशेतील सहवासातील आठवणी व गुरुवर्य सुतार गुरुजी यांनी सर्वांगीण विकासासाठी केलेले शैक्षणिक, कलात्मक व क्रीडात्मक स्पर्धेतील मार्गदर्शन मला मौलिक ठरले. “ अशी भावना मुख्याध्यापक हेमंत धांडे यांनी व्यक्त केले. विजय लुल्हे यांचा प्रेरक सहवास कमी मिळाल्याची खंत व्यक्त करून त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगडताना सहकारी शिक्षक अविनाश मोरे यांनी अनेक आठवणीना उजाळा दिला.
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी, रावेर समन्वयक कलाशिक्षक भाषणात प्रेमादराने म्हणाले की, “पुस्तक भिशी संघटनात शिस्तप्रिय व वक्तशीर असलेले ग्रंथप्रेमी विजय लुल्हे वैयक्तिक जीवनात मात्र स्वतः बाबत बेजबाबदार असून तब्बेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात.”
व्यवहारशून्य उपेक्षित शिक्षक –
“विजय लुल्हे हा विद्यार्थीभिमुख सहशालेय उपक्रम राबविणारा वेडा व व्यवहारशून्य शिक्षक आहे. उपेक्षा हेच विजयचे आत्मिक बळ असल्याने तो वैयक्तिक समस्यांवर मात करू शकला.” असे मार्मिक मत त्यांचे स्नेही तथा चोपडा ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी व्यक्त केले तसेच लुल्हे यांच्या जीवनातील सुखदुःखाचे ऑडिट करून उपस्थितांना अंतर्मुख केले.
सेवापूर्ती सत्काराला उत्तर देतांना विजय लुल्हे यांनी, “माता-पित्यांचे तत्वनिष्ठ संस्कार दीपस्तंभासमान असल्याने मी जीवनातील पराभव पचवून विद्यार्थीभिमुख कृतार्थ शिक्षक होऊ शकलो. कोविड काळात मित्र व सहकार्यांनी दिलेले आर्थिक व भावनिक पाठबळ तसेच सुकन्यांनी निर्भयपणे केलेल्या सेवेमुळे दोनदा कोविड ग्रस्त होऊनही मला नवे जीवदान मिळाले. यापुढेही मित्रपरिवाराचे स्नेहपूर्ण पाठबळ निरंतर मिळाल्यास मी खंबीरपणे उभा राहून यशाशक्ती सामाजिक कार्यात कार्यरत राहीन.” असा आशावाद विजय लुल्हे यांनी व्यक्त केला.
सत्कार करणाऱ्या विविध संस्था व मान्यवर –
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.