‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर संमेलन अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, सुप्रसिद्ध उर्दू कादंबरीकार व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक रहेमान अब्बास धामस्कर,सुप्रसिद्ध कवी संपत सरल, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष प्रतिमा परदेशी व विविध साहित्यिक लेखकांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असून मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षीच्या पुरस्कारार्थी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ संशोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुळ, दुर्मिळ पत्र व छायाचित्र शोधून शासनास सुपूर्द करणारे, शासनाच्या प्रकाशन समितीचे प्रमुख राहिलेले, आयुष्यभर संशोधन कार्यासाठी वाहून घेतलेले मुंबई येथील ज्येष्ठ अभ्यासक विजय सुरवाडे, सत्यशोधक समाजात प्रबोधनाचे कार्य करणारे, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे चंद्रपूर येथील जेष्ठ कार्यकर्ते हिराचंद बोरकुटे, आदिवासी कादंबरीकार म्हणून ख्याती असलेले ज्यांच्या आजवर ७ आदिवासी कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत असे लेखक बाबुलाल नाईक, शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने स्वतःचा ठसा उमटवणारे सत्यशोधक शिक्षण प्रसारक वर्धा चे ज्येष्ठ कार्यकर्ते विचारवंत प्राचार्य जनार्दन देवताळे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून प्रयत्न करणारे नाशिक येथील भेटी जाधव, जल, जंगल, जमीन प्रश्नावर सातत्याने आयुष्यभर लढा देणाऱ्या तसेच तळागाळातील आदिवासी कार्यकर्त्यांसोबत नाळ जोडून त्यांच्या सहकार्याने संघर्ष करणाऱ्या लढाऊ आदिवासी कार्यकर्त्या लिलाबाई वळवी, जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आयुष्यभर प्रबोधन समाजशिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन राष्ट्रीय एकात्मता सामाजिक समता यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खलिल देशमुख, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग या रचनेवर आधारित दहा हजारापेक्षा जास्त निर्भंगांची रचना करणारे निर्भंगावलीकार लेखक कवी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाटील गांधलीकर, अहिराणी भाषेत कथा, कविता व वैचारिक लेख यासारख्या साहित्याचे सातत्याने लिखाण करून अहिराणी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, अहिराणी चे महत्व ठासून सांगणारे सुप्रसिद्ध कवी सुभाष अहिरे, शेतकरी कामगार आदिवासी यासाठी लढा उभारणारे व विद्रोही सांस्कृतिक चळवळीत तसेच शेतकरी आंदोलनात ५० वर्षे सातत्याने सहभाग घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष काकुस्ते यांचा या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. या सर्व मान्यवरांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन भव्य उद्घाटन सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

गेली २० वर्षे विद्रोही सांस्कृतिक चळवळी तर्फे साहित्य सांमजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्या संयोजन समितीच्या वतीने साहित्य व सांस्कृतिक चळवळीला आपले आयुष्य समर्पण करणाऱ्या पुरस्कारार्थीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Protected Content