हरताळा ते आमदगाव वन हद्दीतील रस्त्याला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा आर्थिक पाठिंबा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वनपरिक्षेत्र हद्दीत हरताळा ते अमदगाव दरम्यान वनक्षेत्रात वन हद्दीत ४० ते ५० फूट रुंद जवळपास दोन किलोमीटरचा हेवी लोडिंग वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आलेला असून सदर रस्त्याला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा आर्थिक पाठिंबा असल्याची चर्चा परिसरात आहे. सदर रस्ता तयार करताना शेकडो वृक्षांची कत्तल झालेली आहे.

सदर रस्त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वाहतूकदारांकडून आर्थिक हितसंबंध प्रस्थापित झाल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. या वन हद्दीतील रस्त्याबाबत मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र कार्यालय मध्ये सातत्याने तक्रारी करण्यात येत आहे परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी आर्थिक हितसंबंधापोटी तक्रारदारांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून सदर तक्रारदार हे खंडणीसाठी तक्रार करत असल्याचे दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठांकडे सादर करत स्वतः सदर रस्त्यावरून हेवी लोडिंग वाहतूक करणाऱ्यांकडून स्वतः पैसे वसूल करत असल्याचे बोलले जात आहे. वन हद्दीतील रस्ता शेकडो टिप्पर ट्रॅक्टर पोकलेन साठी मोकळा करून दिलेला आहे. विशेष खेदाची बाब म्हणजे वन हद्दीत येणाऱ्या तीर्थक्षेत्रांना सुद्धा एक इंचाचे सुद्धा अतिरिक्त बांधकाम न करू देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्याच परिक्षेत्रात दोन किलोमीटरच्या ४० ते ५० फूट रुंद रस्त्याबाबत मूंग गिळून गप्प का असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

एरवी शेतकऱ्यांची साधी गाय, बकरी जरी वन हद्दीत दाखल झाली तर त्यांच्या मालकाला सळो की पळो करून सोडणारे वन विभागाचे अधिकारी या रस्त्याबाबत चिडीचूप का असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. हरताळा ते मानेगाव दरम्यान वन हद्दीत शेकडो वृक्षांची कत्तल करून तयार केलेल्या दोन किलोमीटरच्या ५० फूट रुंद रस्त्यावरील हेवी लोडिंग वाहतूक बंद करून सदर रस्त्यावर वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणार का, वनविभागातील वरिष्ठ अधिकारी रस्ता तयार करणाऱ्या मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करणार का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Protected Content