मुंबई वृत्तसंस्था । भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी यावर बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती अशी की, भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रसंगी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ‘नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळं युतीमध्ये गोंधळण्यासारखं काही नाही,’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, उद्धव यांनी शिवसेनेचे नेते व मंत्री यांच्याशी युतीच्या जागावाटपाच्या संदर्भात सुमारे तासभर चर्चा केली. शिवसेना-भाजपमध्ये जागांचा फॉर्मुला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.