मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाल्यामुळे राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांची धुरा ही एकाच वेळेस सासरा आणि जावयांच्या ताब्यात आली आहे.
आज विधानसभेत अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे राहूल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवून विजय संपादन केला. तर शिवसेना आणि मविआचे उमेदवार राजन साळवी यांना अवघी १०६ मते मिळाली. अर्थात, यामुळे राहूल नार्वेकर यांना विधानसभाध्यक्ष म्हणून घोषीत करण्यात आले असून त्यांनी आजच आपल्या कार्याचा कार्यभार सांभाळला आहे.
दरम्यान, राहूल नार्वेकर हे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई असून ते आधीच विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत. यानंतर आता नार्वेकर हे देखील अध्यक्ष झालेत. यामुळे या दोन्ही सभागृहांची धुरा आता अनुक्रमे सासरा आणि जावई यांच्याकडे आली आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. याचा उल्लेख आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला. तर या अनोख्या योगायोगाची आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.