पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि स्टेशन पेटवून देण्याची धमकी; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात एका तरुणाने पोलिसांना भर रस्त्यात शिवीगाळ करत पोलीस स्टेशन पेटवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या मित्रावर कारवाई झाल्याने संतप्त झालेल्या या तरुणाने दारूच्या नशेत पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस किशोर भोई यांना चार ते पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अत्यंत अपमानास्पद शिव्या दिल्या.

इतकेच नव्हे, तर या तरुणाने पोलिसांना त्याला पकडण्याचे आव्हान दिले आणि जर पकडले नाही, तर तो पारोळा पोलीस स्टेशन पेटवून देईल, अशी धमकीही व्हिडिओमध्ये दिली आहे. हा धमकीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होते. आता या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील पवार काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांना खुलेआम धमकी देण्याच्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, लवकरच या तरुणावर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांचे संरक्षण आणि शहरात शांतता राखणे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आता पोलीस या तरुणाला कधी आणि कशी ताब्यात घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content