मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मोहक अभिनय आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. चित्रपट महर्षी दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.
संध्या शांताराम यांनी आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी, सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील अदाकारीने रुपेरी पडदा उजळवला. पिंजरा हा त्यांचा गाजलेला चित्रपट आजही मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जातो. याशिवाय झनक झनक पायल बाजे, नवरंग, दो आंखें बारह हाथ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहेत. “अरे जा रे हट नटखट” या गाण्यात पुरुष व स्त्री अशी दुहेरी वेशभूषा करून त्यांनी साकारलेला अद्वितीय नृत्यप्रकार आजही लोकांच्या स्मरणात आहे.

१९५९ साली प्रदर्शित झालेल्या नवरंग चित्रपटातील त्यांच्या अभिनय आणि नृत्याने रसिकांना थक्क केले होते. त्या काळात नृत्यदिग्दर्शक उपलब्ध नसल्याने या गाण्यातील सर्व नृत्यचाल स्वतः संध्या आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या. हे त्यांचं कलेवरील अपार प्रेम आणि समर्पण दर्शवणारं उदाहरण ठरलं.
संध्या शांताराम यांचं खरं नाव विजया देशमुख होतं. त्यांची कलात्मकता, मेहनत आणि समर्पणामुळे त्यांना मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान मिळालं. त्यांच्या निधनाने अभिनय आणि नृत्यकलेतली एक युगप्रवर्तक प्रतिभा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
पिंजरा, नवरंग आणि झनक झनक पायल बाजे सारख्या चित्रपटांमधून अमर छाप सोडणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणी आणि योगदान सदैव चाहत्यांच्या आणि चित्रपटप्रेमींच्या मनात कायम राहतील.



