जळगाव, प्रतिनिधी | खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या काही कैद्यांना आज (दि.१३) दुपारी येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याना परत नेताना पोलिसांचे वाहन सुरु होत नसल्याने शेवटी उपस्थित नागरिकांना त्याला धक्का मारून सुरु करून द्यावे लागले.
अधिक माहिती अशी की, येथील जिल्हा कारागृहात बंद असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील काही आरोपींना आज दुपारी १.०० ते २.०० च्या दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात पोलिसांच्या वाहनाने आणले असता, परत नेताना रुग्णालयाच्या आवारात सदर वाहन सुरूच होत नव्हते. त्यावेळी आरोपींचे नातलग व इतर उपस्थित नागरिक यांनी वाहनाला धक्का देवून सुरु केले. वरवर पाहता ही बाब सामान्य वाटत असली तरी अशाप्रकारे कैद्यांना नेणारे वाहन रस्त्यात बंद पडणे किंवा सुरूच न होणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. ही घटना गजबजलेल्या ठिकाणी घडली म्हणून लगेच मदत मिळाली, पण निर्जन रस्त्यावर घडली तर अशाच घटनांमुळे बऱ्याचदा घातक कैदी पळून गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.