साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात ‘जनविश्वास सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. याच सप्ताहाचा एक भाग म्हणून, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील फार्मसी आणि एमबीए कॉलेजमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित तरुणींच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, कै. वाय. डी. सराफ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग सराफ, पक्षाचे सरचिटणीस रवींद्र नाना पाटील, सचिव संजय इंगळे, प्राचार्य पराग पाटील, तसेच रागीब अहमद, अमित मोहिते आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस, रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित नेत्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांबद्दल माहिती देण्यात आली. कॉलेज ऑफ फार्मसीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची दखल घेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे रचनात्मक कार्यक्रम आयोजित करून जनमानसात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.



