Home धर्म-समाज भव्य मंडपात फक्त १८ इंचांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना ; भुसावळच्या जय गणेश फाऊंडेशनचा...

भव्य मंडपात फक्त १८ इंचांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना ; भुसावळच्या जय गणेश फाऊंडेशनचा अनोखा गणेशोत्सव

0
5


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भव्य आरास, आकर्षक मंदिराची प्रतिकृती, दहा दिवसांचे भरगच्च सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम; मात्र गणेशमूर्तीची उंची अवघी १८ इंच. हे अनोखे वैशिष्ट्य भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशन नवसाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचे आहे. गेल्या २० वर्षांपासून भव्य देखाव्याच्या मध्यभागी केवळ १८ इंचांची गणेशमूर्ती स्थापन करण्याची परंपरा फाऊंडेशनने कायम ठेवली आहे. ही परंपरा महाराष्ट्रातील आगळीवेगळी गणेशोत्सवाची संकल्पना ठरत आहे.

जय गणेश फाऊंडेशनतर्फे गेल्या दोन दशकांपासून सांस्कृतिक आणि अध्यात्मिक स्वरूपाचा नवसाचा गणपती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी भव्य आरास उभारून धार्मिक, आध्यात्मिक तसेच समाजप्रबोधनात्मक विषय नागरिकांसमोर मांडले जातात. यापूर्वी अक्षरधाम मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, तामिळनाडूतील प्रसिद्ध आदियोगी मंदिर यांसह विविध मंदिरांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय बारा ज्योतिर्लिंग, शिवसृष्टी, ब्रह्मांडसृष्टी, ‘मातापिता हेच विश्व’, गणपती विवाहसोहळा अशा विविध विषयांवर देखावे सादर करून धार्मिक आणि सामाजिक संदेश देण्यात आला आहे. यंदा भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशावर आधारित श्रीमद्भगवद्गीतेचे दर्शन घडविणारे ‘गीता दर्शन मंदिर’ अशी भव्य आरास उभारण्यात आली आहे.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मंदिराच्या आरासीतही गणपतीची मूर्ती मात्र केवळ १८ इंचांचीच ठेवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. भव्यता ही केवळ आरासीत असावी आणि गणरायाच्या मूर्तीचे स्वरूप साधेपणाने ठेवावे, अशी या संकल्पनेमागील भूमिका असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेनुसार जय गणेश फाऊंडेशनकडून दहा दिवस विविध वयोगटातील नागरिकांसाठी स्पर्धा, व्याख्याने, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

उत्सवात त्रिपदी व अथर्वशीर्ष पठण, विष्णुसहस्रनाम जप, सुदृढ बालक स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा, सामूहिक शंखनाद, भजन, ‘गाईड’ हे एकांकिका नाटक, रांगोळी स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, सोलो व ग्रुप डान्स, रंगभरण स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप’ हा निबंध स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला आहे. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालण्याची स्पर्धा तसेच युवकांसाठी ‘जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा’ हे प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.नशामुक्तीचा संदेश देणारी नाटिका, हिंदी-मराठी गीतांचा ‘सदाबहार सूर झंकार’, १०८ कलाकारांच्या सामूहिक सादरीकरणाचा ‘स्वराविष्कार’ आणि ‘पोटात दुखतंय’ या विनोदी नाटिकेसह विविध कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या अनोख्या गणेशोत्सवाचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, कार्याध्यक्ष तुषार झांबरे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर व निलेश कोलते, सचिव प्रकाश चौधरी यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, युथ क्लब अध्यक्ष हर्षल वानखेडे, नचिकेत यावलकर, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुधीर देशपांडे, रविंद्र पाटील, संतोष भारंबे, ललित धांडे, बाबूसेठ चोरडिया, रामा चौधरी, अनिल वानखेडे, रवी जोनवाल, प्रा. ए. व्ही. चौधरी, आर्य नेमाडे, ओम चौधरी, पार्थ चौधरी, अभिषेक वाणी, जगदीश राठोड, अमरीश करसाळे, योगेश पवार, अशोक धांडे, प्रविण पाटील, संदीप दुसाने, महेंद्र महाजन, कृष्णा मराठे, प्रभाकर चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवासाठी योगदान देत आहेत.


Protected Content

Play sound