जळगाव प्रतिनिधी | जळगाव विमानतळावर विविध सुविधा मिळण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली असून यामुळे पाच विविध कामांना गती मिळणार आहे.
जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गुरूवारी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. यात प्रामुख्याने पुणे आणि इंदोर सेवा सुरू करणे करण्यासह अजिंठा ते जळगाव हेलिकॉप्टर सेवा, जळगाव विमानतळावर मंजूर असलेल्या हेलिकॉप्टर व विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला गती त्याचप्रमाणे शेतमाल,नाशवंत व किमती मालाची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी कार्गो लॉजिस्टिकची निर्मिती करणे, मोठ्या आकाराची विमाने थांबण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवणे या विविध विषयांवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे व इंदोर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली यावेळी जळगाव विमानतळाचा चौफेर विकास करण्यासाठी विविध पाच विषयांवर केंद्रीय मंत्र्यांनी माहिती जाणून घेतली.
दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीत संवाद साधत जळगाव हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. आणि ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालय आग्रही आहे. त्यामूळे जळगाव विमानतळ हे लवकरच देशाच्या नकाशावर अजिंठा हेलीपोर्ट सेवेमुळे चर्चेत येईल असे ते म्हणाले.