लहान वाघोदा येथे श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मौजे वाघोदे खुर्द तालुका रावेर येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.. वनराई बंधारा मुळे परिसरातील वाहून जाणारे पाणी कार्यक्षमतेने अडवले जाते व त्याचा उपयोग आजूबाजूच्या शेतातील पिकांना जीवदान सिंचन देण्यासाठी होत असतो. सदर वनराई बंधारे हे जिवंत नाल्यांमध्ये साधारणता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये तयार केले जातात. वनराई बंधारे शास्त्रीय पद्धतीने कसे बांधावेत याची माहिती कृषी पर्यवेक्षक श्री. सचिन गायकवाड यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. तसेच गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली चौधरी यांनी सदर वनराई बंधाऱ्यामुळे अडवले गेलेले पाणी जिरवण्यासाठी मदत होणार आहे व आजूबाजूच्या विहिरी तसेच विंधन विहिरीची पाण्याची पातळी निश्चित वाढणार आहे असे मत व्यक्त केले. असे बंधारे नाल्या नाल्यांवर प्रत्येक गावात बांधले गेल्यास तसेच जलसाक्षरता निर्माण केल्यास निश्चितच फायदा होईल. असे मत व्यक्त करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सी.डी.साठे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. तालुका कृषी अधिकारी भामरे, मंडळ कृषी अधिकारी ढाळे सर यांनी सदर योजनेची प्रचार प्रसिद्धी करून शास्त्रीय माहिती शास्त्रोक्त पद्धतीने बंधारा कसा बांधावा याचे मार्गदर्शन केले. सदर बंधाऱ्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी तसेच कृषी विभागाचे कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सदर बंधरामुळे लागूनच असलेल्या जवळजवळ 15 एकर क्षेत्रासाठी हरभरा पिकाच्या सिंचनाची सुविधा होणार आहे. संजय विठ्ठल पाटील या शेतकऱ्याच्या शेताजवळ सदरचा बंधारा त्यांच्यासाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे. सदर बंधाऱ्यात श्रमदान करताना कृषी विभागाचे सतीश तायडे, सचिन गायकवाड, राजेंद्र कोंडे, सविता बाविस्कर, प्रीती सरोदे, आशा तडवी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच सौ. दिपाली जितेंद्र चौधरी , ग्रा प सदस्य जितेंद्र चौधरी, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, ग्रां . पं . कर्मचारी रवी कोळी,ग्रामस्थ वसंत चौधरी, विशाल कोळी हे उपस्थित होते.

Protected Content