मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | वंचित बहूजन आघाडीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्याच उमेदवाराला धक्का दिला आहे. वंचितने या मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
पक्षाच्या या निर्णयाविरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा वंचितच्या वतीने करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीनीने उमेदवारी रद्द केल्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार देणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार? याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.