चोपडा – येथील श्री.व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे नवरात्र उत्सवात पार पडणारा वहनोत्सव व रथोत्सव यंदा कोविड १९ महामारीच्या निमित्ताने स्थगित करण्याचा निर्णय संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी यांनी जाहिर केला आहे.तथापि वहनोत्सव व रथोत्सव भाविकांच्या श्रध्दांचा विचार करता मंदिरातच साजरा केला जाणार आहे.
येथील श्री.व्यंकटेश बालाजी संस्थानने सुमारे पाचशे साडेपाचशे वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव यंदा होणार नाही. चोपड्याची सांस्कृतिक विरासत असलेला वहनोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते विजया दशमी या नवरात्र काळात शेकडो वर्षांपासून सुरु आहे. नवरात्रीचे नऊ दिवस श्री.बालाजी महाराज विविध वहनांवर आरुढ होवून शहरातील विविध भागात भक्तांना भेटीसाठी जात असल्याची परंपरा आहे.या वहनोत्सवाचे जोरदार स्वागत होत असे भाविक आपआपल्या परिसरांत श्रद्धेने आरती देवून बालाजींचे स्वागत करीत असत.तसेच श्री.व्यंकटेश बालाजी मंदिरापासून एकादशीला रथोत्सवनिमित्त रथारुढ श्री.बालाजींचा रथ निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री भाविकांना दर्शनार्थ मुक्कामी ठेवण्याची परंपरा आहे.तर द्वादशीला बाजारपेठ मार्गाने बालाजी महाराजांचा रथ मंदिरात जवळ परत येण्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.त्यानिमित्ताने शहरात यात्रा भरण्याची मोठी परंपरा पहिल्यांदाच स्थगित होत आहे.
यावर्षी दि.१७ ते २५ आक्टोबर दरम्यान वहनोत्सव पार पडणार होता.तर दि.२६ व २७ रोजी रथोत्सव सालाबादाप्रमाणे पार पडणार होता.मात्र कोविड १९ महामारीच्या संसर्गाचा विचार करता हा उत्सव यंदा स्थगित करण्यात आला आहे.
मंदिरातच होणार दर्शन
या दुर्धर प्रसंगातही वहनोत्सव व रथोत्सव रद्द करण्यात आला असला तरी भाविकांच्या सोयीसाठी दररोज विविध वहनांवर आरुढ होवून मंदिरातच श्री.बालाजी महाराज दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.तसेच रथोत्सव देखील मंदिरा जवळच पार पडणार आहे.दररोज रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान भक्तांना दर्शन करता येणार आहे. यावेळी भाविक भक्तांनी तोंडावर मास्क वापरून सोशल डिस्टंसिंग ठेवत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.व्यंकटेश बालाजी मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.
बालाजींना सोनसाखळी
दरम्यान श्री.व्यंकटेश बालाजींना स्टेट बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बापूराव कुळकर्णी व त्यांचे पुत्र विवेक कुलकर्णी यांनी पुजाविधी करुन सोनसाखळी अर्पण केली.यावेळी संस्थानचे विश्वस्त प्रवीण गुजराथी व कुलकर्णी कुटुंबीय उपस्थित होते.
ऎतिहासीक परंपरा असलेला चोपड्यातील वहनोत्सव व रथोत्सव यंदा स्थगित
4 years ago
No Comments