मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता असून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे.
उर्मिला यांचं नाव शिवसेनेकडून निश्चित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत बातचीत केली. तसेच उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्यास होकार देखील दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली होती.
मात्र भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून देण्यात आले होते. यानंतर शिवसेनेने त्यांना ऑफर दिली असून त्यांनी होकार दिल्याची माहिती आता समोर आली आहे.