चाळीसगाव प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने चाळीसगाव पंचायत समितीच्या कार्यालयात आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात येवून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आमदार चव्हाण म्हणाले की, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. ६ जून रोजी शिवाजी महाराजांनी केलेला शिवराज्याभिषेक म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन होय. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवरायांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात उभारलेले गड किल्ले हे रयतेला आधार देणारी केंद्रे होती. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी गडकिल्ले याबरोबरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा यामाध्यमातून रयतेला न्याय दिला असता. म्हणून आज आपल्याकडे या संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आली आहे, शिवरायांचे मावळे म्हणून आपली जबाबदारी आहे की पंचायत समिती असो की इतर कोणतीही संस्था तेथे येणाऱ्या प्रत्येक शेतकरी, वंचित घटक याला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, त्याची पिळवणूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. हाच शासनाचा हा शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा उद्देश आहे, आणि तो साध्य करण्यासाठी राजकिय जोडे बाजूला ठेवून जनतेसाठी काम करणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल अशी भावना चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती आवारात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करण्यात येऊन त्यावर भगवा स्वराज्यध्वज फडकवण्यात आला. त्याचे पूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटनेते संजय पाटील, सदस्य सुभाष पैलवान, सहाय्यक गटविकास अधिकारी पवार, प्रशासन अधिकारी गांगुर्डे आदी उपस्थित होते.