यावल प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज झालेल्या विशेष सभेत दोन समिती वगळता सर्वच समितीत महिलाराज स्थापन झाले आहे. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महर्षी व्यास, यावल शहर विकास आघाडी गटानेते आणि कॉंग्रेसच्या गटनेत्यास सभापतीपदासाठी उमेदवार दिल्यामुळे सर्वच विषय समिती सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. पालिकेत सत्तारूढ व सर्वाधिक सात सदस्य संख्याबळ असलेल्या काँग्रेसला मात्र या निवडणुकीमध्ये महर्षी व्यास आघाडी, व शहर विकास आघाडी गटाशी जुळवून घ्यावे लागले. त्यामुळे काँग्रेसला एका समितीत सभापतीपद मिळाले.
बिनविरोध निवडून आलेले विषय समिती सभापती पुढीलप्रमाणे :-
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी देवयानी महाजन, पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापतीपदी पदसिध्द उपनगराध्यक्ष राकेश कोलते, शिक्षण समिती सभापतीपदी रुखमाबाई भालेराव, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी नौशाद मुबारक तडवी,
आरोग्य वैद्दक व स्वच्छता समिती सभापतीपदी सैय्यद युनुस सैय्यद युसूफ, स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष राकेश कोलते, सदस्य सर्व विषय समिती सभापती देवयानी महाजन, रुख्माबाई भालेराव, सैय्यद युनुस सैय्यद युसूफ, नौशाद तडवी या सर्वांची सभापतीपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार कुंवर यांनी सर्व सभापतिपदाच्या उमेदवारांना बिनविरोध घोषित केले आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, तहसीलदार जितेंद्र कुंवर, मुख्याधिकारी बबन तडवी, कार्यालयीन अधिक्षक विजय बडे हे उपस्थित होते. निवडणुक कामकाजात वरिष्ठ लिपीक रमाकांत मोरे, लिपीक शिवानंद कानडे आणि तुषार सोनार यांनी सहकार्य केले.