जळगाव-जितेंद्र कोतवाल ( स्पेशल फिचर ) | लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून सक्रीय सदस्यांच्या ‘टॉप-१०’ यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या माहितीनुसार विद्यमान म्हणजेच सतराव्या लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. या लोकसभेत तब्बल २७० खासदार हे आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या संसद सदस्यांनी गेल्या चार वर्षात नेमकी काय कामगिरी बजावली याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेस मधून समोर आलेली आहे. या संदर्भातील माहिती ‘पीआरएस इंडिया’ या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली असून हिंदूस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सध्याच्या लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या २७० सदस्यौपैकी मंत्रीपद मिळालेल्या तसेच अतिशय अल्प सहभाग घेतलेल्या सदस्यांना वगळून २५० सदस्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता अतिशय मनोरंजक माहिती समोर आली आहे. यात सदस्यांनी गेल्या चार वर्षात तब्बल ४११०४ प्रश्न विचारले असून ६८५ खासगी विधेयके सादर केली आहेत. यासोबत या सदस्यांनी अंडर हाऊस रूल-३७७ च्या अंतर्गत १९०८ महत्वाचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले आहेत.
या तिन्ही म्हणजेच प्रश्न, विधेयके आणि चर्चांमधील सहभाग निकषांच्या बाबतीत काही खासदार हे आघाडीवर दिसून आले आहेत. यांची यादी पीआरएस इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली आहे. यात आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पहिल्या दहापैकी निम्मे म्हणजे पाच सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे तिसर्या, शिवसेनेचे खासदार संजय मंडलीक हे पाचव्या, राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे हे सहाव्या; भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील हे आठव्या तर जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे दहाव्या स्थानावर आहेत.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची छाप आधीच उमटवली असतांना सर्वाधीक सक्रीय असणार्या टॉप-१० सदस्यांमध्ये त्यांचा झालेला समावेश हा लक्षणीय मानला जात आहे. त्यांनी गेल्या चार वर्षात ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. यात वर नमूद केल्यानुसार तिन्ही बाबींचा समावेश आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात गिरणा परिक्रमेसह राबविलेले उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. ते आमदार असतांना शासकीय योजनांची भरवलेली जत्रा ही कौतुकाचा विषय बनली होती. यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून याला मोठी लोकप्रियता लाभली आहे. यातच लोकसभेत पहिल्यांदा निवडून येऊन देखील अतिशय सक्रीयपणे संसदीय कार्यात सहभाग नोंदवून त्यांची आपल्या कार्याची अमीट छाप उमटवली आहे.