जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकुण सरासरी ४९ टक्के मतदान झाले.
दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खुल्या संर्वगात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जमाती संर्वगात एका जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगात एका जाaगेसाठी ३ उमेदवार आणि महिला संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार उभे आहेत.
एकुण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती पैकी ११ हजार १३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवरील ६० बुथवर एकुण सरासरी ४९ टक्के एवढे मतदान झाल्याची आकडेवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाली. सर्वत्र मतदान शांततेत झाले. सकाळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी भुसावळ येथील पी. ओ. नहाटा महाविद्यालय, जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीमधील मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी एरंडोल, पारोळा,धुळे, शिरपूर, अमळनेर येथील मतदान केंद्रांना तर कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव येथील मतदान केंद्राना भेटी देवून मतदानाचा आढावा घेतला. वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, साक्री येथील केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त होता. ज्या केंद्रांवर काही अडचणी आल्या त्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ९ विभागीय अधिकारी, ८ क्षेत्रीय अधिकारी, ६० केंद्राध्यक्ष आणि ३७० मतदान अधिकारी व मतदान सेवक यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला.
बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी ९ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत २४ टक्के तर दोन वाजेपर्यंत सरासरी ३७ टक्के मतदान झाले होते. अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी दिली.