मुक्ताईनगरात विद्यापीठस्तरीय ‘विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा’ संपन्न

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी जी खडसे महाविद्यालयात एक दिवशीय “विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा” संपन्न झाली.

येथील श्रीमती जी जी खडसे महाविद्यालयात गुरुवार, दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ‘विद्यार्थी विकास विभाग’ व खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर ‘विद्यार्थी विकास विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय “विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन होते. प्रमुख उपस्थिती उप-प्राचार्य प्रा.डॉ.ए.पी.पाटील यांची होती. या कार्यशाळेचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख व महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी केले. त्यात त्यांनी नमूद केले की, “अशा कार्यशाळांच्या माध्यमातून समाजाची एक नवी सृजनशील पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल. तसेच समाजाच्या एका महत्वपूर्ण अंगाचा विकास साधला जाईल व युवती अधिक सक्षम होतील.”

उद्घाटनपर मनोगतात अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी, “समाजाची नवनिर्मिती आणि उन्नत समाज निर्माण करण्यासाठी विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास होणे अतिशय गरजेचे असून त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य अधिक सदृढ ठेवण्यास मदत होईल. त्या दृष्टीने तरुण पिढीने व तरुणींनी मार्गक्रमण करावं व त्याद्वारे आपले आणि समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत” असा संदेश दिला.

अध्यक्षीय मनोगतातून प्र.प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन यांनी, “विद्यार्थिनींना स्वयं- शिस्तीचे महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. आणि समाजातून अशा विचार करणाऱ्या तरुणी तयार होण गरजेच आहे आणि त्या अश्या कार्यशाळांच्या माध्यमातून तयार होतील म्हणूनच अशा कार्यशाळांची आवश्यकता आहे.” असे प्रतिपादन केले.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ.सौ.प्रणिता सरोदे यांनी ‘महिलांचे आरोग्य व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर प्रकाश टाकतांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राच्या अनुभवातून महिलांना व तरुणींना कोण-कोणत्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते व त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो. या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच आपले आरोग्य कसे सदृढ राहील व त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले.

दुसरे प्रमुख वक्ते डॉ.सौ.पंचशीला वाघमारे (संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर) यांनी “कौटुंबिक हिंसाचार व कायदेशीर तरतुदी” हा विषय स्पष्ट करताना यावर असणाऱ्या कलमांचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट केले. त्यातून उत्तम समाजजीवनाचं गणित कसं मांडता येईल व तरुणींना घरेलू हिंसेला सामोरे जावे लागणार नाही यावर अधिक भर दिला आणि समजा जावेच लागले तर त्या संदर्भातील कायदेशीर तरतुदी काय आहेत यावर अधिक सखोल आणि मुद्देसूद मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे तिसरे वक्ते सौ. रंजना महाजन यांनी “सोशल मिडीयाचा युवतींच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम” या विषयावर प्रकाश टाकताना सांगितले कि स्मार्ट फोन च्या या युगात प्रत्येकालाच वाटते कि मी ऑनलाईन असाव परंतु त्याचा आपल्या आरोग्यावर तसेच विचार करण्यावर अतिशय दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे नैराश्य आणि अवास्तव कल्पना अपेक्षा अश्या विचित्र आजारांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तंत्र ज्ञानाचा वापर हा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी व्हावा. असे प्रतिपादन केले.

सदर कार्यशाळेचा समारोप प्र. प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थीनिनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल यावर भर देवून आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करावेत व उत्तम आयुष्य जगावे असा सल्ला दिला व अश्या कार्यशाळांचा त्यात मोठा वाटा आहे हे सुद्धा विषद केले.

कार्यशाळेचा समारोप उप-प्राचार्य प्रा.डॉ.ए.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडला. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी वरील सर्व मुद्द्याचे सविस्तर विवेचन केले व अशा कार्यशाळा आयोजित करण्यावर विद्यापीठ, महाविद्यालय तसेच शिक्षकांनी भर दिला पाहिजे त्यातून च भावी पिढी उत्तम ,सुजाण सुसंस्कृत निर्माण होईल. असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी महिला विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा.ताहिरा मीर आशिक हुसेन यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.एस.डी.चाटे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन युवती सभा सदस्य प्रा.सौ.छाया खर्चे यांनी केले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरणगाव,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा व खडसे महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या. एकूण ७० विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही.बी.डांगे, रासेयो सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बावस्कर, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ठींगळे तसेच प्रा.डॉ.अनिल शिंदे वरणगाव महाविद्यालय, प्रा.सौ.कोल्हे कुऱ्हा महाविद्यालय यांची उपस्थिती होती.

कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे, प्रा.डॉ.अतुल बढे , प्रा.एस.व्ही.पाटील, प्रा.डॉ.शेख, प्रा.डॉ.भले प्रा.डॉ.चाटे प्रा.सौ.राणे तसेच संपूर्ण युवती सभा सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content