दिवाळी नंतरच उडणार निवडणुकांचा बार : लवकरच प्रशासक राज

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणावर स्वाक्षरी केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवरही लवकरच प्रशासक राज येणार आहे. ( Jalgaon Local Body Election-2022 )

ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि आता असेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ओबीसी राजकीय आरक्षण देण्यासंदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरी करून मंजुरी दिली. यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आता ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भातल्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता प्रभाग संरचनेसाठी जेवढा वेळ लागेल तो आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्ही हे काम सहा महिन्यांच्या आत संपवू. एखाद्या गोष्टीचा कायदा एकमताने झाला असेल, त्याला राज्यपालांनी मान्यता दिली असेल; तर तो नक्कीच दीर्घकाळ टिकेल. न्यायालयाच्या आदेशामुळे तो फेटाळला जाणार नाही. इम्पेरिकल डेटाची गरज आहेच; तो तीन महिन्यांच्या आत गोळा केला जाईल, असा शासन निर्णय आम्ही काढला असून, त्यासाठी विशेष आयोगाचीही आम्ही निर्मिती केली आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी म्हटल्यानुसार सहा महिन्यांच्या आत निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असली तरी यातील क्लिष्टता आणि आरक्षणाबाबतचा ठोस निर्णय या कालावधीत होईलच याची शक्यता नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता १५ नगरपालिका आणि नगरपरिषदांची मुदत संपली असून तेथे आधीच प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. तर आगामी २१ मार्च रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त होणार असल्याची बाब उघड आहे. या दोन्ही ठिकाणी किमान सहा महिन्यांपर्यंत प्रशासक राज राहणार असल्याचे आता दिसून येत आहे. तर, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे जाणार असल्याचे स्पष्ट होताच इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या आहेत.

Protected Content