यापुढे माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही

मुंबईः वृत्तसंस्था । ‘यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही,’ असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. एकनाथ खडसेंनी वक्तव्य केल्यानंतर दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगावात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यांनी अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या, असा आरोप खडसेंनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना ‘खडसे यांच्याविरोधातील खटला संपला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आरोपपत्र अजून दाखल झालेलं नाही तर, खटला संपला कसा?’ कसा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

‘खडसे हे खूनशी प्रवृत्तीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण, खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कोणीच केला नाही. खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. त्यामुळं त्यांना धडा शिकवण्यासाठी एफआयआर दाखल केला,’ असंही त्या म्हणाल्या आहेत.

‘खडसे माझ्या विरोधात जेवढे बोलतील तेवढी मी त्यांच्याविरोधात खंबीरपणे लढेल. तुम्हाला कोणत्या पक्षात जायचं ते जा त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. पण याद राखा, पुन्हा जर पत्रकार परिषदांमध्ये माझं नाव घेतलं तर मी सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे

 

Protected Content