केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘पंढरपूर सायकल वारी’चे उद्घाटन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल – पंढरपूर २०२५’ या भव्य उपक्रमाचे उद्घाटन झाले. या उपक्रमात ५००० हून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला. त्यांनी १० लाख किलोमीटरहून अधिक अंतर पार करत भारतातील सर्वात मोठ्या सायकल मेळाव्याचा विक्रम प्रस्थापित केला.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील ९० पेक्षा जास्त सायकलिंग क्लबमधून आलेल्या सायकलप्रेमींनी यात उत्साहाने सहभाग घेतला. या सायकलस्वारांनी ४०० ते ४५० किलोमीटरचा सायकल प्रवास करून सोलापूर जिल्ह्यातील पवित्र वारी स्थळ पंढरपूर गाठले. पंढरपूर नगरीत त्यांनी नगर प्रदक्षिणा आणि पारंपरिक रिंगण सोहळ्यातही सक्रिय सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र – मुंबई आणि पंढरपूर सायकल वारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ‘फिटनेस का डोस – आधा घंटा रोज’ या राष्ट्रीय घोषवाक्याचे महत्त्व या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयप्रकाश गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (IRS), आणि १९ वेळा आयर्नमॅन ठरलेले प्रसिद्ध एंडुरन्स सायकलस्वार डॉ. अमित समर्थ (नागपूर) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सायकलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, “सायकलिंग ही केवळ एक खेळाची किंवा व्यायामाची बाब नसून, ती पर्यावरणस्नेही, आरोग्यवर्धक आणि शाश्वत जीवनशैलीचा भाग आहे. प्रत्येकाने फिटनेससाठी दररोज किमान अर्धा तास शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. पंढरपूरसारख्या श्रद्धास्थळी हा उपक्रम पार पडणे म्हणजे अध्यात्म, आरोग्य व पर्यावरण यांचा सुंदर संगम आहे.”

रेल्वे मैदान ‘फिट इंडिया – संडे ऑन सायकल’ अशा घोषणांनी चैतन्यशील व प्रेरणादायी वातावरणाने गजबजून गेले होते. सायकलिंगमुळे शाश्वत वाहतूक, सामूहिक आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश समाजात रुजवला जात आहे. हा उपक्रम फिट इंडिया चळवळीला मोठी चालना देणारा ठरला आहे.