जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव जिल्हा दौर्याच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाने आधीच मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठिकठिकाणी सभा घेत असून ते आधी महाराष्ट्र दौर्यावर येऊन गेले आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी ते जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याची माहिती आधी समोर आली होती. साधारणपणे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मोदींचा दौरा असेल असे मानले जात होते. तथापि, आता याच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दिनांक १५ रोजी अमित शाहा यांची जळगाव जिल्ह्यात बैठक होत आहे. ते युवा संमेलनानिमित्त जळगावात येत आहेत. यात ते युवकांना संबोधीत करणार आहेत. तसेच, याप्रसंगी काही मान्यवरांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता देखील आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या दौर्याची जय्यत तयारी सुरू आहे.