मुंबई/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरीत होऊन आणि शिवसेनेत कार्यरत झालो. बाळासाहेब आपले खरे गुरू असून माझे दैवत आहेत. गेल्या ३८ वर्षे एक नेता, एक विचार आणि एक झेंडा यांनाच प्रमाण मानून आपली वाटचाल सुरू असून भविष्यातही यावरून आपण मार्गक्रमण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी केले. गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर ते बोलत होते.
माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आज गुरपौर्णिमेनिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. याप्रसंगी ते म्हणाले की, बाळासाहेब हे आपले राजकीय आणि सामाजिक गुरू होत. त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आपण शिवसेनेत कार्यरत झालो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा साहेबांचा मूलमंत्र आपण कधीही विसरलो नाही. याचमुळे माझ्यासारख्या एका सर्वसाधारण शिवसैनिकाला राज्यातील महत्वाचे मंत्रीपद मिळाले याचा सार्थ अभिमान आहे.
आ. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीबाबत काही जण आमच्यावर चुकीची टिका करत आहेत. आम्ही शिवसेना सोडली तर नाहीच, पण यात फूटदेखील पाडलेली नाही. उलटपक्षीय आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या विचारांवरून आगामी वाटचाल कायम ठेवण्याचा संकल्प आम्ही करत असल्याचे प्रतिपादन आ. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.