दुदैवी घटना : सेंट्रींगचे काम सुरु असताना ९ व्या मजल्यावरुन मजुराचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीच्या ठिकाणी सेटींग काम करत असताना, अचानक ९ व्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बंडू वना सोनवणे (वय ५२, रा.आसोदा रोड, गुरुदत्त कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू सोनवणे हे आपल्या कुटुंबासह गुरूदत्त कॉलनीत वास्तव्याला आहे. सेंटीगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून सेटींगचे काम करत होते. मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीचे काम सुरु आहे. बुधवारी ८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता इमारतीच्या ९ व्या मजल्यावर बंडू सोनवणे हे सेटींगचे काम करत होते. हे काम करत असताना, अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट नवव्या मजल्यावरुन खाली पडले. याठिकाणी असलेल्या इतर मजूर व नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषीत केले. बंडू वना सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन विवाहित मुली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content