मांजरी चावल्याने बालकाचा दुदैवी मृत्यू; मृत्यूचे कारण धक्कादायक

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मित्रांसमवेत खेळत असताना एका मांजरीने चावा घेतल्यानंतर अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर तालुक्यातील उखळी गावात उघडकीस आली आहे. श्रेयान्शू क्रिष्णा पेंदाम, असे या मुलाचे नाव आहे. श्रेयान्शू हा ९ मार्च शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास मित्रांसोबत खेळत होता. खेळत असताना एका मांजरीने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला. चावा घेतल्यानंतर श्रेयान्शू घरी आला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. काही वेळानंतर त्याला मळमळ झाली आणि उलट्या सुरू झाल्या. आई-वडिल त्याला लता मंगेशकर रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तेथून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल, असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
मांजरीने चावा घेतल्याने मृत्यू होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. मांजरीचा हल्ला आणि चावा घेतल्यानंतर श्रेयांशू घाबरला आणि त्याला उलट्या सुरू झाल्या. उलटी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा किंवा आणखी कोणत्या तरी विषारी श्वापदाने दंश केला असावा. पायाला जखम होणे किरकोळ असले तरी महत्त्वाच्या अवयवाच्या रक्तवाहिनीला इजा झाल्याने मृत्यू होऊ शकतो. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे आताच सांगणे कठीण आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल, असे हिंगणा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे म्हणाले.

Protected Content