जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील बिबानगर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी महामंडळातील चालक हे घरी कुलर मध्ये पाणी भरत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का लागून ते बाजूला फेकले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे तर यावेळी वडिलांना वाचवण्यात आलेला मुलगा मात्र थोडक्यात बचावला आहे. याबाबत तालुका पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८, मूळ रा. कठोरा ता. जळगाव,हल्ली मु. बिबा नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून ते कार्यरत होते. तर त्यांनी वायरमन म्हणून देखील काम केलेले आहे. ते कठोरा येथे राहत होते. मात्र जळगाव शहरात बिबा नगर येथे त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले होते. तेथे राहायला गेले होते. शनिवारी दि. १ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते ड्युटी वरून काही कामानिमित्त घरी आले होते. त्यावेळेला घरी कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी ते गेले असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले.
या वेळेला त्यांचा मुलगा त्यांना वाचण्यासाठी आला असतांना त्यालाही विजेचा धक्का लागत असताना थोडक्यात बचावला आहे. यानंतर मात्र कुटुंबीयांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने भास्कर बोरसे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी रुग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.