पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरामध्ये कॉलेज चौकात भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला आहे तर याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अद्याप अपघाताची नोंद झालेली नाही. संतोष शिवसिंग परदेशी (वय ३७, रा. गाळण ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष परदेशी हा तरूण आपल्या आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह पाचोरा तालुक्यातील गाळण येथे वास्तव्याला होता. शनिवारी १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ते कल्याण स्टेशनवरून पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरला. स्टेशनवर उतरल्यावर गाळण येथे घरी जाण्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराची लिफ्ट मागितली. या दुचाकीस्वाराच्या सोबत जात असताना कॉलेज चौकात आल्यावर भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. यातील संतोष परदेशी यांच्यावर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान जळगावात संतोष परदेशी यांचा उपचार सुरू असताना रात्री ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला होता. दरम्यान घटनेप्रकरणी संतोष परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते.