पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्हयात हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात घडली. प्रिन्स चंद्रकुमार कोशले (वय २, रा. अष्टापूर मळा, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एका ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू शिवराम माने (वय ४४, रा. साठे वस्ती, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील रायवाडी रस्त्यावरील गणेश खेडेकर यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. प्रिन्सचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत. याठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु टाकीवर झाकण बसविण्यात आले नव्हते. प्रिन्स खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला. त्यात तो बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.