जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचा अल्बम घेण्यासाठी जात असलेल्या नवविवाहित तरुणाचा ट्रकच्या भीषण धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चोपडा तालुक्यातील धानोराच्या पुढे पुलाजवळ पिरोबाच्या मंदिराजवळ मंगळवारी २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. चेतन गणेश माळी (वय २२, रा. दहिवद ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन माळी हा तरूण अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण यांच्यासह राहत होता. तो पुण्यात नोकरी करून हातभार लावत होता. त्याचे तीन महिन्यांपूर्वी चोपडा तालुक्यातील लासूर येथील मुलीशी नुकतेच लग्न झाले होते. मंगळवारी २ जुलै रोजी चेतन हा सकाळी अडावद येथे त्याच्या लग्नाचा अल्बम घेण्यासाठी मावसभाऊ जीवन गजानन माळी (वय २४, रा. किनगाव ता. यावल) याच्यासह गेलेला होता.
चोपडा तालुक्यात धानोराच्या पुढे पुलाजवळ पिरोबाच्या मंदिरापाशी चेतनच्या दुचाकीला ट्रकला धडक बसल्याने त्याच्या डोक्याला आणि डाव्या हाताला जबर मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला तर मावस भाऊ जीवन माळी हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी चेतन माळी याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांना जबर धक्का बसला असून त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या घटनेबाबत धानोरा पोलीसात अपघात प्रकरणी नोंद घेण्याचे काम कसुरू होते.