भुसावळ/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई येथे संसाराचा सामान घेऊन रेल्वेतून प्रवास करत असताना अचानक विवाहितेची तब्येत बिघडली आणि त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संदर्भात भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रियंका अक्षय सुरोशे वय-२०, रा. ज्ञानेश्वर नगर, अकोला असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय सुरोशे हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत कार्यरत असल्याने प्रियंका दोन महिने सासरी राहिल्यानंतर मुंबईत स्थायिक होण्यासाठी निघाल्या होत्या. २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये आपल्या सासू साधना सुरोशे यांच्यासोबत त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत संसाराचा सामानही होता. शेगाव स्थानकाजवळ प्रियंकाने जेवण केले. मात्र, काही वेळाने मलकापूरजवळ अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उलट्या सुरू झाल्या. प्रकृती अधिक खालावल्याने सासू साधना सुरोसे यांनी रेल्वेतील टीसीशी संपर्क साधून तातडीने वैद्यकीय मदतीची मागणी केली. टीसीने “भुसावळ येथे उपचार मिळतील” असे सांगितले. मात्र, प्रियंका यांची प्रकृती गंभीर होत गेली. रेल्वे भुसावळ स्थानकात पोहोचताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रात्री १२ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रियंका यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. मृत्यूची बातमी कळताच माहेरच्या मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच हंबरडा फोडला. प्रियंका यांच्या पश्चात पती अक्षय सुरोसे, सासू, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी नंदू खरडे करीत आहेत.