मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरामध्ये अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहराच्या मुख्य मार्गांवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

शहरातील मुख्य बाजारपेठ प्रवर्तन चौक हा मुक्ताईनगरच्या आर्थिक हालचालींचे केंद्र मानला जातो. संध्याकाळी सातच्या सुमारास येथे मोठी गर्दी असते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बाजारपेठ उघडल्यावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा वेळी अवजड वाहनांचा मोकाट शिरकाव शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, शहराच्या प्रवेशद्वारावर पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कॉन्स्टेबल नियुक्त केले आहेत. मात्र, गर्दीच्या वेळीही शहरात मोठमोठी वाहने कशी प्रवेश करतात, हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. प्रशासनाच्या नियोजनात काहीतरी त्रुटी आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अवजड वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि लहान मुले यांना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाड्यांच्या संथ हालचालीमुळे लहान रस्त्यांवर वाहतुकीचा गोंधळ उडतो, परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढते. “ही वाहतूक बंद होण्यासाठी एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहायची का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील व्यापारी, रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. गर्दीच्या वेळेत अवजड वाहतुकीस बंदी घालावी, किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.